मंत्रपुष्पांजलीचा अर्थ

  



भारतात सर्वत्र , आणि त्यातही विशेषतः महाराष्ट्रामध्ये देवांच्या आरतीच्या शेवटी मन्त्रपुष्पांजलीचे श्लोक म्हणण्याचा प्रघात आहे. गणेशोत्सवाच्या काळात ही मंत्रपुष्पांजली किमान ध्वनिमुद्रित स्वरूपात तरी आपल्या वारंवार कानी पडते. 


मंत्रपुष्पांजली या शब्दाचा अर्थ मंत्ररूपी फुलांची ओंजळ असा आहे. शुक्लयजुर्वेदाचा 'देवेमंत्र' नावाचा एक परिशिष्टरूप भाग आहे. त्यातील मंत्रांचा वापर मंत्रपुष्पांजलीत केला जातो. त्यात 'देवाः' हा शब्द वारंवार येत असल्याने यांना 'देवेमंत्र' असे म्हणतात. हे एकूण २३ मंत्र असले तरी आजकाल ते सर्व म्हंटले जात नाहीत. आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळणाऱ्या मंत्रपुष्पांजलीत त्यापैकी केवळ ४ मंत्र दिसतात. 


मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रांमधून व्यक्त झालेल्या भावना आणि प्रार्थना आजही आपल्याकरिता कालसुसंगत आणि उपयुक्त कशा आहेत याविषयी थोडे विवेचन--


मन्त्र १--


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन्। ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः।।


● अन्वय-- ॐ देवाः यज्ञेन यज्ञम् अयजन्त।  तानि प्रथमानि धर्माणि आसन्। ते महिमानः नाकं च सचन्त ह यत्र पूर्वे साध्याः देवाः सन्ति । 


● अर्थ-- ॐ देवांनी यज्ञरूपी साधनानेच यज्ञ केला. हे यज्ञच देवांचे सुरुवातीचे धर्म (कर्तव्य) होते. त्यांनी खरोखर (यज्ञामुळेच) मोठेपणा मिळवला आणि जिथे प्राचीन साध्यदेवांचा निवास आहे त्या स्वर्गस्थानाची प्राप्ती केली. 


● स्पष्टीकरण-- ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या १६४ व्या सूक्तातील ही ५० वी ऋचा आहे. पुन्हा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात ती येते.आणि अथर्ववेदातही हा मंत्र आढळतो. या ऋचेमध्ये यज्ञाच्या शक्तिमुळेच देवांना स्वर्गलोक आणि महानता यांची प्राप्ती झाल्याचे म्हंटले आहे.


यज्ञ म्हणजे 'वेदीवर अग्नी पेटवून त्यात देवतांना उद्देशून मंत्रोच्चारणासह काही द्रव्ये अर्पण करणे' असा पारंपारिक अर्थ मनात येतो. 


परंतु यज्ञामागील मूळ कल्पना 'जिथून आपल्याला काहीतरी प्राप्त होते त्या मूलस्रोताचे पुनर्भरण करणे' ही आहे. यालाच आजकाल recycling/replenishing असे म्हणतात.


सृष्टीमधून आपले जीवन चालविण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या गोष्टींच्या सृष्टीतील मूल स्रोतांविषयी आपल्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. आणि ती कृतज्ञता दर्शविण्यासाठी आपल्याला मिळालेल्या गोष्टींचा अल्पसा का होईना अंश आपण त्यांना परत केला पाहिजे. ही परत करण्याची क्रिया म्हणजेच यज्ञ. ही सृष्टीतील आदान-प्रदानाची गती चक्राकार स्वरूपाची आहे. या चक्रीय गतीला प्राचीन ऋषींनी यज्ञचक्र असे म्हंटले आहे.


सृष्टीतील उपभोग्य वस्तूंचे मूलस्रोत निर्जीव दिसले तरी त्या प्रत्येकामागे शक्तीचा एकेक दिव्य अंश विद्यमान आहे. ते अंश म्हणजेच हे वेगवेगळे देव होत. त्यांना आपण यज्ञाच्या अग्निमध्ये हविर्भाग अर्पण करून संतोष देऊ शकतो आणि संतुष्ट झालेले हे देव पुन्हा आपल्याला इच्छित गोष्टी प्राप्त करून देतात, अशी वैदिक आर्यांची श्रद्धा होती आणि त्यात वैज्ञानिक तथ्यही आहे.


आजकाल विज्ञानालाही हे पटू लागलं आहे की सृष्टीकडून सर्वकाही फक्त ओरबाडून घेऊन चालणार नाही तर ती सुस्थितीत राहण्यासाठी तिला काहीतरी परतही द्यावे लागेल. त्यातून पर्यावरण रक्षण, जलपुनर्भरण, वनीकरण वगैरे गोष्टी सुरू झाल्यात. 


भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात---


सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा 

पुरोवाच प्रजापतिः।

अनेन प्रसविष्यध्वमेष 

वो अस्त्विष्टकामधुक्।।


पूर्वी प्रजापतीने (ब्रह्मदेवाने) ही सर्व जीवजंतूंची प्रजा निर्माण करताना त्यांच्याबरोबरच यज्ञदेखील उत्पन्न केला आणि तो त्या प्रजेला म्हणाला, " या यज्ञाच्या साह्याने तुम्ही नवनिर्मिती करा. हा यज्ञ तुमच्या सर्व कामना पूर्ण करणारा होवो." 


देवान्भावयतानेन 

ते देवा भावयन्तु वः।

परस्परं भावयन्तः 

श्रेयः परमवाप्स्यथ।।


" या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा म्हणजे उलटपक्षी ते देव तुम्हाला संतुष्ट करतील. अशाप्रकारे परस्परांना संतुष्ट करत तुम्ही मोठ्या कल्याणाची प्राप्ती कराल."


एवं प्रवर्तितं चक्रं 

नानुवर्तयतीह यः।

अघायुरिन्द्रियारामो 

मोघं पार्थ स जीवति।।


श्रीकृष्ण म्हणतात, " हे अर्जुना, अशाप्रकारे चालणाऱ्या यज्ञचक्राचे जो अनुसरण करत नाही तो स्वार्थलोलुप मनुष्य केवळ पापच भक्षण करतो. अशा माणसाचे जीवनच व्यर्थ आहे."


भौतिक प्रगतीच्या नावाखाली सभोवतालची नैसर्गिक संपदा ओरबाडणाऱ्या आणि अविचारीपणे नष्ट करणाऱ्या माणसाचं डोकं ठिकाणावर आणणारा हा उपदेश आज किती प्रासंगिक आहे हे सांगायला नको. मंत्रपुष्पांजलीमध्ये आणि गीतेत उल्लेखिलेले,  हे यज्ञचक्र आपण आपल्या आणि जगाच्या कल्याणाकरिता चालवले पाहिजे. 


या मंत्रात साध्याः या शब्दाने स्वर्गामध्ये राहणाऱ्या १२ देवतांच्या समूहाचा उल्लेख आला आहे. अनुमन्ता, प्राण, नर, वीर्य्य, यान, चित्ति, हय, नय, हंस, नारायण, प्रभव और विभु अशी त्यांची नावे आहेत.


मंत्र--२ 


ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामकामाय कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।।


● अन्वय-- वयं राजाधिराजाय प्रसह्यसाहिने वैश्रवणाय नमः कुर्महे। सः कामेश्वरः वैश्रवणः कामकामाय मे कामान् ददातु। महाराजाय कुबेराय वैश्ववणाय नमः। 


अर्थ-- ओम्। आम्ही राजाधिराज आणि अत्यंत बलशाली अशा विश्रव्याच्या पुत्राला, वैश्रवणाला (कुबेराला) नमस्कार करतो. सर्व कामनांचा अधिपती असलेला तो वैश्रवण अनेक भोग्य गोष्टींची इच्छा करणाऱ्या मला ते भोग प्रदान करो. त्या महान् राजाला, वैश्ववण कुबेराला नमस्कार असो. 


स्पष्टीकरण-- तैत्तिरीय आरण्यक नावाच्या वेदग्रंथातील पहिल्या प्रपाठकातील ३१ व्या अनुवाकातला हा सहावा मंत्र आहे. (हे प्रपाठक, अनुवाक वगैरे आजकालच्या पुस्तकातल्या chapters , sub-chapters प्रमाणे आहेत असं समजा.) 


सर्व इच्छांचा आणि वासनांचा निरास करणे , सत्त्वगुणी बनणे, वैराग्याची आणि नंतर त्यातून मोक्षाची प्राप्ती करणे हे भारताचे सर्वोच्च आध्यात्मिक ध्येय आहे खरे, परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक ह्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात. 


शुद्ध सत्त्वगुणाची ती वासनाहीन स्थिती प्राप्त करण्यापूर्वी माणसाला रजोगुणाच्या म्हणजे क्रियाशीलतेच्या आणि वासनापूर्तीच्या अवस्थेतून जावेच लागते. प्राचीन ऋषींना याची सुस्पष्ट कल्पना होती. म्हणून त्यांना आपल्या इच्छा, कामना उघडपणे सांगण्यात संकोच वाटत नव्हता. 


आजकाल 'मला ही इच्छा आहे ' असं उघडपणानं सांगण्यास आपण किती कचरतो! जणू काय अशा इच्छा बाळगणं म्हणजे अपराधच!! आपण अत्यंत तमोगुणी आणि आळशी आहोत. हजारो इच्छा आपल्या मनात अर्धसुप्तावस्थेत वळवळत असताना धर्म आणि समाज यांच्या धाकाने आपण त्यांचं आपल्यातलं अस्तित्वच नाकारतो आणि शुद्ध सत्त्वगुणी असल्याचा आव आणतो. म्हणून आपल्याकडं भगवे कपडे घालून प्रत्यक्षात वेगळंच आचरण करणाऱ्या भोंदूंची संख्या प्रचंड आहे.


असला दुटप्पीपणा आणि आत्मवंचना करणं ऋषींना मान्य नव्हतं. 'जे आहे, ते आहे' म्हणून स्वीकारणं जमलं तरच त्याचा निरास करणं जमू शकतं. म्हणून वैराग्याच्या उच्च आदर्शाचा फक्त देखावा करून भोगांची आतली इच्छा नाकारण्याचा दांभिकपणा ऋषी करत नाहीत. "आम्हाला भोग हवे आहेत", असं ते रोखठोकपणे सांगतात.


या कामनांच्या पूर्तीसाठी आपल्याला देवांचा खजिनदार आणि यक्षांचा राजा असलेल्या कुबेराशिवाय आणखी कोण मदत करू शकणार? जगातल्या सर्व भोगांची प्राप्ती धनाशिवाय होत नाही. म्हणून ऋषींनी या धनाध्यक्षालाच कामनापूर्तीसाठी साकडं घातलं आहे. हा राजांचाही राजा वैश्रवण सर्व कामनांचा अधिपती असल्याने मला तो पाहिजेल ती गोष्ट मला मिळवून देईल असे ऋषीला वाटते. 


श्लोक--३


ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति।।


● अन्वय-- ॐ स्वस्ति। साम्राज्यम् , भौज्यम्, स्वाराज्यम् , वैराज्यम् , पारमेष्ठ्यम् , राज्यम् , महाराज्यम् , आधिपत्यम्। अयं समन्तपर्यायी सार्वभौमः आन्तात् आपरार्धात् सार्वायुषः समुद्रपर्यन्तायै पृथिव्यै एकराट् इति।  


अर्थ-- ओम् , कल्याण असो. या यज्ञाच्या यजमानाला साम्राज्य, भोगण्याचे सामर्थ्य, स्वतंत्रता, वैशिष्ट्यपूर्ण राजेपण, सर्वोच्च स्थान, राज्य, महाराज्य आणि सर्वांचे आधिपत्य प्राप्त होवो. हा राजा, विशाल राज्याच्या सीमेपर्यंत संचार करणारा, सर्व भूमीचा अधिपती होवो.परार्धाच्या अंतापर्यंतच्या सर्व आयुष्याची त्याला प्राप्ती होवो.समुद्रवलयांकित पृथ्वीचा तो एकछत्री सम्राट् होवो.


स्पष्टीकरण-- हा मंत्र 'ऐतरेय ब्राह्मण' या ग्रंथाच्या आठव्या पंचिकेच्या १५ व्या खंडातून घेतला आहे. आविक्षिताच्या पुत्राला म्हणजे मरुत्त नावाच्या क्षत्रिय राजाला महाभिषेक करणाऱ्या पुरोहिताने या महाभिषेकानंतर मरुत्ताने दिग्विजय करावा आणि समुद्रवलयांकित पृथ्वीचे सम्राट् व्हावे अशी कामना केली आहे. 


ऋषी यज्ञ करणाऱ्या क्षत्रिय यजमानासाठी महान राज्याची, सर्वोच्च सत्तेच्या प्राप्तीची कामना करत आहे. आसमुद्र एकछत्री राज्याची ही कल्पना आजच्या आपल्या अखंड भारताच्या निर्मितीच्या ध्येयाशी सुसंगत अशीच आहे.


श्लोक --४


तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।


● अन्वय-- तदपि एषः श्लोकः अभिगीतः। आविक्षितस्य कामप्रेः गृहे मरुतः परिवेष्टारः (भूत्वा ) अवसन्। विश्वेदेवाः (तस्य) सभासदः (आसन्)।


अर्थ-- त्या (दिग्विजयानंतर मरुत्ताने केलेल्या यज्ञाच्या) संबंधात हा श्लोक गायिला जातो--आविक्षिताचा पुत्र आणि कामप्र राजाचा वंशज मरुत्त याच्या घरी मरुद्गण (एकूण ४९ संख्या असलेला देवतासमूह) वाढपी म्हणून राहिले. तसेच विश्वेदेव (१० देवतांचा एक अन्य समूह) त्याच्या यज्ञसभेचे सभासद होते.


स्पष्टीकरण--हा मंत्र 'ऐतरेय ब्राह्मण' या ग्रंथाच्या आठव्या पंचिकेच्या २१ व्या खंडातून घेतला आहे. 


अविक्षित नावाच्या राजाचा मुलगा असा आविक्षित शब्दाचा अर्थ आहे. तर कामप्र नावाच्या राजाच्या वंशात जन्मलेला म्हणजे कामप्रि. महाभारतात उल्लेखिलेल्या पाच चक्रवर्ती सम्राटांपैकी एक असलेल्या या मरुत्त राजाचे राज्य वैशाली या नावाने ओळखले जाई. मरुत्ताच्या आईचे नाव होते भामिनी.


याच्यासंदर्भात ऐतरेयब्राह्मणात एक मोठी रोचक कथा आलेली आहे. बृहस्पती आणि संवर्त नावाचे दोन भाऊ मरुत्ताचे ऋत्विज अथवा पुरोहित होते. मरुत्त आणि स्वर्गाचा राजा इंद्र यांचे वैर असल्याने मरुत्ताचे इंद्राशी नेहमी युद्ध चालत असे. परंतु इंद्र त्याला पराजित करू शकला नाही. म्हणून मरुत्ताच्या दिग्विजयानंतर इंद्राने बृहस्पतीला फितवले आणि 'तू मरुत्ताच्या यज्ञाचा ऋत्विज होऊ नकोस' असे सांगितले. 


बृहस्पतीने यानुसार मरुत्ताला आपला नकार कळवला तेव्हा नारदांच्या सल्ल्यानुसार मरुत्ताने त्याच्या भावाला, संवर्ताला यज्ञाचा पुरोहित म्हणून नेमले आणि यज्ञ सुरू केला.हा यज्ञ उशीरबीज नामक देशामध्ये यमुनेच्या काठावरल्या प्लक्षावरण तीर्थ नावाच्या स्थळी झाला.


इंद्राने विविध मार्गांनी तो यज्ञ बंद पडावा म्हणून प्रयत्न केले. त्याने अग्नीकरवी मरुत्ताला निरोप पाठवला की 'बृहस्पती आता तुझे यज्ञकार्य करण्यास तयार आहे. तेव्हा तू तुझा पुरोहित बदलून बृहस्पतीलाच पुन्हा तिथे नेमावेस.' परंतु संवर्ताच्या शापाच्या भीतीने अग्नीने हा निरोप मरुत्ताला पोहचविलाच नाही. यानंतर धृतराष्ट्र नामक गंधर्वाकडून इंद्राने मरुत्ताला दुसरा निरोप पाठवला की ' तुझा यज्ञ बंद कर नाहीतर मी वज्राने तुला ठार मारेन.' 


संवर्ताने मरुत्ताला धीर देऊन यज्ञ चालूच ठेवला. मरुत्ताची इच्छा होती की सर्व देवांनी यज्ञामधला हविर्भाग स्वीकारावा. संवर्ताने आपल्या मंत्रशक्तीने इंद्रासह सर्व देवतांना यज्ञात आणून   हविर्भाग स्वीकारण्यास भाग पाडले.मरुत्ताने आलेल्या सर्व देवांचा यथोचित सन्मान केल्यामुळे सर्व देव त्याच्यावर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी मरुत्ताला हिमालयाचे सुवर्णमय शिखर प्रदान केले. 


मंत्रामध्ये 'मरुतः' या शब्दाने अंतरिक्षस्थ देवतांच्या एका गणाचा--मरुद्गणाचा-- उल्लेख आहे. त्यांची संख्या ४९ इतकी असते. 'विश्वे देवाः' या नावाने देवतांचा दुसरा एक गण ओळखला जातो. त्यांची संख्या १० आहे.


मरुत्ताच्या यज्ञसभेमध्ये विश्वेदेव सभासद म्हणून बसत असत. मरुद्गणांनी या यज्ञामध्ये परिवेष्टा (पंक्तीला अन्न वाढणारे वाढपी) म्हणून काम केले असे म्हणतात.या गौरवपूर्ण घटनेचा उल्लेख वरील मंत्रात आहे.


वरील चार मंत्र म्हणून देवतेला पुष्प आणि अक्षता वाहिल्या जातात. या मंत्रात उल्लेख केल्याप्रमाणे भारतीयांनी दिग्विजय करावा. आणि यज्ञचक्राचेही प्रवर्तन करून विश्वकल्याणाला हातभार लावावा.